About Us
संस्थेची माहिती
सन १९१४-१८ चे पहिले विश्वयुद्ध संपल्यानंतर हिंदूस्थान देशातील आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली नोकरदार वर्गाला पगारातून प्रापंचिक खर्च भागविणे अवघड झाले. त्यामुळे सावकारी कचाटयात नोकरदार सापडू लागले. या अडचणींतून पगारदार वर्गाला आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने पोस्ट , आर.एम.एस. व टेलिकॉम कर्मचाऱ्यांना एकत्रित करून सहकारी तत्वावर पतपेढी स्थापण्याचा संकल्प केला.
१० ऑक्टोबर १९२१ या मंगलदिनी एक इंग्रज अधिकारी डायरेक्टर – जनरल सर ह्यूबर्ट सॅम्स, सी. आय. ई. , आय. सी. एस. यांनी पुणे मुख्य टपाल कार्यालयाच्या व्हरांडयामध्ये संस्थेची स्थापना केली. संस्थेचे लावलेले छोटेसे रोपटे आज पाहता पाहता असंख्य सभासद, कर्मचारी, ज्ञात – अज्ञात हितचिंतक यांच्या सहकार्याने एका भव्य वटवृक्षाच्या रूपात परिवर्तित झाले आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे संस्थेने आपल्या स्वमालकीच्या विविध वास्तूंमध्ये शतकपूर्ती साजरी केली आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र आता पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, रायगड, मुंबई, ठाणे, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नांदेड, जळगाव, नाशिक व उर्वरित महाराष्ट्र एवढे विस्तारले आहे.
इवलेंसे रोप लावियलें द्वारी l
तयाचा वेलू गेला गगनावेरी l l
आज संस्था कोणालाही हेवा वाटावा अशा प्रगतीच्या शिखरावर आहे. मुदत ठेवीधारकांनी संस्थेवर विश्वास ठेऊन रु.४० कोटींचा टप्पा केव्हाच पार केला आहे. मदत ठेवींच्या दुप्पट रकमेचे ‘ कर्जवाटप ’ झाले आहे. कर्जमर्यादा ५० लाखांपर्यंत पोहोचली आहे. दरवर्षी संस्था सभासदांना आकर्षक दराने लाभांश देऊ करते. या शिवाय दरवर्षी ( अंदाजे रु.८००/- पर्यंत ) एक आकर्षक व उपयुक्त भेटवस्तूही सभासदांना दिली जाते. आर्थिक सक्षमतेबरोबरच ‘ सामाजिक बांधिलकीचे ‘ वाण संस्थेने स्विकारले आहे. एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचे रककम रु. ५ लाख पर्यंत कर्ज संस्था माफ करते. शिवाय त्याच्या कुटुंबियांना रु. १०,०००/- ची तात्काळ मदतही देते.
सभासदांच्या दुर्धर आजारात उदा. हृदयरोग, बाय पास सर्जरी, किडनी ट्रान्सप्लन्ट ऑपरेशन, डायलीसीस, कॅन्सर इ. साठी रु.५,०००/- पासून रु.२०,०००/- पर्यंत मदत देऊ करते. सभासदांच्या दोन मुलींपर्यंत, त्यांच्या विवाहात ‘ कन्यादान ’ योजनेअंतर्गत संस्था रु. ११,०००/- चा आहेर करते. नुकत्याच सुरु झालेल्या ‘ संस्थेची लेक ’ या योजने अंतर्गत संस्थेने इतरांनी आदर्श घ्यावा असे पाऊल उचलले आहे. जानेवारी २०१३ नंतर एखाद्या सभासदाच्या घरी कन्यारत्न जन्माला आल्यास संस्था तिच्या नावाने रु.५०,०००/- ची रक्कम बाजूला ठेवते. तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी संस्था हि रक्कम (रु. ५०,०००/-) तिला सप्रेम भेट देते, या रकमेचा उपयोग तिच्या उच्च शिक्षणासाठी अथवा विवाहासाठी व्हावा अशी संस्थेची इच्छा आहे. या शिवाय दरवर्षी २६ जानेवारी रोजी ( प्रजासत्ताक दिनी ) सलग २६ वर्षे सभासद राहून संस्थेला साथ देणाऱ्या निष्ठावान सभासदांचा सत्कार करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
संस्थेचा वर्धापनदिनहि भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या निमित्ताने सभासदांच्या गुणवान पाल्यांचा आणि स्वतः गुणवंत सभासदांचाही सत्कार केला जातो. यामध्ये इयत्ता १० वी, १२ वी व पदवीधर परीक्षेत उच्चांकी गुण मिळवणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला जातो. तसेच पोस्ट, टेलिकॉम व आर.एम.एस. या तिन्ही विभागातील ज्या सभासदांना त्यांच्या विभागातर्फे ” गुणवंत कामगार ” पुरस्कार प्राप्त झाला असेल त्या सभासदांचाही सत्कार पुन:श्च वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात करून त्यांच्या गुणांची दाखल घेतली जाते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शैक्षणिक, राजकीय अथवा कला क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित केले जाते. संस्थेच्या भक्कम आधारामुळे सभासदांचे जीवनमान उंचावले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. संस्थेकडून विविध प्रकारची कर्जवाटप केली जातात. उदा. गृहकर्ज, वाहन कर्ज, कॉम्प्युटर कर्ज, गृहोपयोगी वस्तू कर्ज, पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज इ. या सर्व योजनांमुळे सामान्य कर्मचाऱ्यांची घरे झाली. तसेच चारचाकी, दुचाकी घेणे शक्य झाले, कॉम्प्युटर तसेच गृहोपयोगी किंमती वस्तू घेणे सहज शक्य झाले. मुले उच्च शिक्षण घेण्यासाठी सहज परदेशात जाऊ लागली आणि एकंदरीतच सभासदांच्या जीवनमानात सुधारणा झाली आणि संस्था सभासदांच्या मनावर “ राज्य “ करू लागली. संस्थेच्या प्रगतीचा हा ‘ अश्वमेध ’ म्हणूनच कोणीही अडवू शकलेला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनाही नुसता तलवारीचा ‘ पराक्रम ‘ करून राज्यमान्यता मिळवता आली नाही, तर त्यासाठी त्यांना ‘ राज्याभिषेक ‘ करून घ्यावाच लागला होता असे इतिहास सांगतो. तसाच राज्याभिषेक संस्थेनेही करून घेतला आहे. ‘आय.एस.ओ.–९००१’ प्रमाणपत्र असे या मुकुटाचे नाव आहे.
संस्थेने स्वतःच्या मालकीची असणारी भव्य चार मजली वास्तू आणि ती ही पुण्याच्या मध्यवर्ती अशा ‘ सदाशिव पेठेत ‘ ही ‘ स्वप्नवत ‘ वाटणारी गोष्ट. दापोली, जिल्हा रत्नागिरी, या पर्यटन स्थळी संस्थेची २ बी.एच.के. सदनिका हॉलिडे होम म्हणून सभासदांकरिता उपलब्ध असून या ठिकाणी अत्यल्प दर आकारण्यात येतो.